सर्व्हे - राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:06 AM2023-05-24T11:06:11+5:302023-05-24T11:18:57+5:30

सर्व्हेत सहभागी ४३ टक्के लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएला तिसऱ्यांदा सत्ता मिळायला हवी असं तर ३८ टक्के लोकांनी विरोधात मतदान केले आहे.

Survey - Increase in Rahul Gandhi's popularity, Good News for BJP despite Karnataka results | सर्व्हे - राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News

सर्व्हे - राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News

googlenewsNext

नवी दिल्ली - कर्नाटकात काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानंतर भाजपा आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी टीकेचा भडीमार केला आहे. मोदींची लाट राज्यात ओसरली का? राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ होतेय? यासारख्या विविध प्रश्नांवर लोकनीती-सीएसडीएस आणि एनडीटीव्हीने केलेल्या सर्व्हेमधून लोकांची मते जाणून घेतली आहेत. 

सर्व्हेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधानपदासाठीही लोकांची पहिली पसंती नरेंद्र मोदी आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर १९ राज्यात १० मे ते १९ मे या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला. कर्नाटकात दारूण पराभव झाल्यानंतरही या सर्व्हेमधून भाजपाला गुड न्यूज मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला धक्का पोहचला नाही त्याचसोबत पक्षाच्या मतदान टक्केवारीतही फारसा फरक दिसत नाही. 

सर्व्हेत सहभागी ४३ टक्के लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएला तिसऱ्यांदा सत्ता मिळायला हवी असं तर ३८ टक्के लोकांनी विरोधात मतदान केले आहे. जर आज निवडणुका लागल्या तर ४० टक्के जनतेने भाजपाला मतदान देणार असल्याचे म्हटलं. तर २९ टक्के लोकांनी काँग्रेसला पसंती दर्शवली. २०१९ मध्ये भाजपाची मतदान टक्केवारी ३७ टक्के होती ती २०२३ मध्ये ३९ टक्के झाली आहे. परंतु काँग्रेसच्या मतदान टक्केवारीत १९ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. 

विशेष म्हणजे आज निवडणुका लागल्या तर पंतप्रधानपदासाठी ४३ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पहिली पसंती दिली आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर राहुल गांधी आहेत. २७ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांना अनुक्रमे ४ टक्के लोकांनी पसंती दाखवली आहे. अखिलेश यादव ३ टक्के तर नितीश कुमारांना १ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करणाऱ्यांपैकी बहुतांश त्यांच्या भाषणाचे चाहते आहेत. विकासासाठी २० टक्के, हार्ड वर्कसाठी १३ टक्के, मोदींची लाट १३ टक्के आणि ११ टक्के मोदी सरकारच्या धोरणांना लोकांची पसंती आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर कोण देईल? हे लोकांना विचारले असता त्यानुसार ३४ टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले तर ११ टक्के अरविंद केजरीवाल, ५ टक्के अखिलेश यादव आणि ४ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींची नाव घेतले. 

भारत जोडो यात्रेचा फायदा 
२६ टक्के लोकांनी आधीपासून राहुल गांधींना पसंत करत असल्याचे सांगितले. तर १५ टक्के लोकांनी भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींना पसंत करण्यास सुरुवात केली आहे. १६ टक्के लोकांनी काँग्रेस नेत्यांना पसंत करत नसल्याचे सांगितले. ५५ टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे म्हटलं. तर ३८ टक्के लोकांनी काही अपवाद वगळता समाधानी आहोत असं म्हटलं. २१ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही असं म्हटलं. लोकनीती-सीएसडीएसने ७१ लोकसभा मतदारसंघात ७२०२ लोकांमध्ये हा सर्व्हे केला. 
 

Web Title: Survey - Increase in Rahul Gandhi's popularity, Good News for BJP despite Karnataka results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.