नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारचा ५ वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी पूर्ण होत आहे. त्यामुळेच, १ वर्षे अगोदरच भाजपने लोकसभा निवडणुकांची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने बजेटमध्येही मोठी तरतूद केल्याचं दिसून आलं. तर, देशातील मोठी राज्ये आपल्या ताब्यात घेऊन तेथून सर्वाधिक खासदार निवडून आणयची रणनिती भाजपची आहे. दोन दिवसापूर्वीच भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला. तर, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पूर्ण झाली आहे. काँग्रेस पक्षाला याचा निश्चित फायदा झालाय. मूड ऑफ नेशनच्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या जागा कमी होणार असून काँग्रेसच्या चांगलं यश मिळणार आहे.
जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सर्वेत भाजपच्या जागांमध्ये घरसरण झाल्याचं दिसून आले. तर, यूपीएच्या जागांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक परिणाम काँग्रेसला झाला असून काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. 'मूड ऑफ द नेशन' या संस्थेने हा राजकीय सर्वे घेतला होता. सध्याच्या घडीला निवडणूक झाली काय निकाल लागू शकतो, यावर सर्वे घेण्यात आला होता. त्यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 298 जागा मिळू शकतात, तर, काँग्रेसप्रणीत यूपीएला 153 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना 92 जागांवर समाधान मानावे लागेल, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आलीय.
सहा महिन्यापूर्वी (ऑगस्ट 2022 ) सी वोटरनं घेतलेल्या सर्वेत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 307 जागा मिळतील असा अंदाज होता. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 125 जागांची शक्यता होती. त्याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष असे 111 जागांचा अंदाज होता. म्हणजेच, भाजपच्या जागांमध्ये ९ जागांनी घट झाल्याचं सध्याचा सर्वे सांगतोय.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांना अद्यापही सव्वा वर्षे बाकी असून भाजपकडून मिशन २०२४ ठरवण्यात येतय. यंदाची निवडणूकही मोदींच्या नेतृत्वात जिंकायचा चंग भाजपने बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या काही दिवस अगोदर अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधून त्याचं काम पूर्णत्त्वात येत आहे.