पटना : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. तसेच, मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे, अशा सूचनादेखील सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य होती, हे या निर्णयावरून हे स्पष्ट झाले. आता सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, "आमच्या सरकारने जे काम केले ते कायदेशीर होते, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली. आता मला विश्वास आहे की सीबीआय कसून चौकशी करुन न्याय देईल. न्यायाची आशा फक्त सुशांतच्या कुटुंबीयांना किंवा बिहारमधील लोकांना नाही तर संपूर्ण देशाला आहे."
नितीश कुमार यांच्याआधी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण प्रचंड आनंदी असल्याचं सांगत हा 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचेही गुप्तेश्वर पांडे म्हणाले आहेत.
गुप्तेश्वर पांडे म्हणाले, "न्यायालयाच्या निर्णयामुळे 130 कोटी जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयायबद्दल असलेली आस्था अजून दृढ झाली आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे. आता लोकांना सुशांत प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे. ही संपूर्ण देशासाठी मोठी बातमी आहे. आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवले तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आले. यावरुन लोकांना काहीतरी गडबड असल्याचे वाटत होते. आम्ही जे काही काम केले ते कायदेशीर पद्धतीने केले. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे."
दरम्यान, सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.
आणखी बातम्या...
भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा
अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर
शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"