नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी 14 जून रोजी आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर दिल्लीच्या एम्समधील डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नाही तर हे आत्महत्येचं प्रकरण असल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता काँग्रेसच्या एका नेत्याने रिया चक्रवर्तीच्या सुटकेची मागणी केली आहे.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही राजकारणाचा बळी ठरली असल्याचं म्हटलं आहे. तसेच तिला त्रास देऊ नका, तिची सुटका करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. एम्सने सुशांतने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याचं म्हटल्यानंतर चौधरी यांनी रियाच्या सुटकेची मागणी केली आहे. "आता भाजपाची प्रचार यंत्रणा एम्सच्या फॉरेन्सिक टीमवर देखील आरोप करू शकते. सुशांतच्या मृत्यूमुळे सर्वच जण दु:खी आहेत. मी आधीच म्हटलं होतं रिया चक्रवर्ती निर्दोष आहे."
"जास्त त्रास न देता तिची सुटका केली पाहिजे"
"रिया राजकारणाचा बळी ठरली आहे. जास्त त्रास न देता तिची सुटका केली पाहिजे" असं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी चौधरी यांनी रिया चक्रवर्ती ही बंगाली ब्राह्मण महिला असल्याचं सांगितलं. तसेच रियाचे वडील हे लष्करामधून निवृत्त झालेले अधिकारी असून, त्यांनी अनेक वर्षे देशाची सेवा केला. मात्र आज ते आपल्या दोन मुलांना न्याय मिळवून देऊ शकत नाही आहेत अशी खंत व्यक्त केली होती.
रियाने कुठलाही आर्थिक गुन्हा केला नसल्याचा केला होता दावा
रिया चक्रवर्तीला झालेली अटक ही भयावह घटना असल्याचंही ते म्हणाले होते. रियाने कोणालाही आत्महत्या किंवा हत्येसाठी भाग पाडले नसल्याचं, तसेच तिने कुठलाही आर्थिक गुन्हा केला नसल्याचा दावाही चौधरी यांनी केला होता. रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. ही कारवाई केवळ आपल्या राजकीय नेतृत्वाला खूश करण्यासाठी करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली भूमिका निभावून नेली आहे. मात्र या समुद्र मंथनातून त्यांनी अमृताऐवजी अंमली पदार्थांचा शोध लावला आहे, असा टोला अधीर रंजन चौधरी यांनी लगावला होता.
"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. "सुशांतसिंह राजपूत हा देशाचा अभिनेता होता. मात्र भाजपाने निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकलं" असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडीलही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्यास पात्र आहेत, सर्वांसाठी न्याय हे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे" असं म्हटलं होतं.