नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यावर विषप्रयोग केल्यामुळे त्याचे शवविच्छेदन उशिरा करण्यात आले. जेणेकरून हे विष ठराविक काळानंतर पोटात विरघळून जाईल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनीही त्याच्या शवविच्छेदनावर सवाल उपस्थित केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये "आता सैतानी मारेकऱ्यांची मानसिकता आणि त्यांची मजल कुठपर्यंत गेलेली आहे, हे हळूहळू उघड होत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या पोटात विष विरघळून जावे आणि ते ओळखता येऊ नये, यासाठी त्याचे शवविच्छेदन जाणूनबुजून उशिरा करण्यात आले. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्याची ही वेळ आहे," असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह म्हणाले, "कोरोना काळात शवविच्छेदन करण्यास उशिर होऊ शकतो. मात्र, काहीतरी खाल्ल्यानतंर काही तास जिवंत असेपर्यंत ते रक्तात मिसळते. पण, या प्रकरणात मृत्यू काही तासांमध्ये झाला, त्यानंतर काय खाल्ले ते रक्तामध्ये जाऊ शकत नाही. अशावेळी शवविच्छेदन विलंबाचा फारसा परिणाम होत नाही. तरीही सुशांत सिंह राजपूतच्या पोटात काहीही सापडले नाही, असे शवविच्छेदन अहवालात येते. त्यामुळे हा शवविच्छेदन अहवाल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे."
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत विविध मुद्दे उपस्थित करत आहेत. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही महेश भट्ट यांच्याशी झालेल्या संभाषणाद्वारे अडचणीत येऊ शकते असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.
या पूर्वीच्या एका ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी विषप्रयोगाबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. या वेळी त्यांनी सुनंदा पुष्कर प्रकरणाचा उल्लेख केला. त्या प्रकरणात पोटात आढळलेल्या विषारी पदार्थामुळे ते प्रकरण उघड झाले. अशा प्रकारचा तपास अभिनेत्री श्रीदेवी आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात करण्यात आला नाही, असे सांगत असतानाच सुशांत सिंह राजपूतचा खून झाला, त्याच दिवशी अय्याश खान नावाचा ड्रग डिलर सुशांत सिंह राजपूतला कशासाठी भेटला? असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
आणखी बातम्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...