नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही. सहा महिन्यांपूर्वी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळून आला. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर सीबीआयनं प्रकरणाचा तपास हाती घेतला. मात्र तब्बल १४५ दिवसांनंतरही सीबीआयच्या हाती ठोस असं काहीही हाती लागलेलं नाही. या प्रकरणाचे सर्व पैलू लक्षात घेऊन तपास सुरू असून कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे.भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) पत्र लिहून सुशांत प्रकरणाच्या तपासाची माहिती मागितली होती. त्यानंतर सीबीआयनं पीएमओला पत्र लिहून तपासाबद्दलची माहिती दिली. 'केंद्रीय तपास यंत्रणा अतिशय सखोलपणे प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्राचा वापर केला जात आहे. तपासादरम्यान मृत्यूच्या सर्व पैलूंचा विचार करण्यात येत आहे. कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नाही,' अशी माहिती सीबीआयनं स्वामी यांना आज दिली.
...म्हणून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अद्याप अपूर्ण; सीबीआयनं सांगितलं कारण
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 5:45 PM