नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. अलका प्रिया यांनी ही याचिका दाखल केली होती. सध्या पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना त्यांचं काम करू द्या, असं सर्वोच्च न्यायालयानं अलका प्रिया यांच्या याचिकेवर भाष्य करताना म्हटलं. या प्रकरणाशी अलका यांचा थेट असा कोणताही संबंध नाही. त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, अशी सूचना न्यायालयानं केली. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता राजकारणही सुरू झालं आहे. या प्रकरणात राज्यातले पोलीस अपयशी ठरल्याची टीका भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी बिहार पोलिसांनी तपासात केलेल्या हस्तक्षेपावर हरकत घेतली आहे. ज्या राज्यात घटना घडते, तिथे येऊन तपास करायचा झाल्यास दुसऱ्या राज्यातल्या पोलिसांना परवानगी घ्यावी लागते. मात्र तशी कोणतीही परवानगी बिहार पोलिसांनी घेतलेली नाही. त्यामुळे प्रोटोकॉलची अंमलबजावणी झालेली नाही, असं देसाई म्हणाले.सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात बिहारमध्ये एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत आले आहेत. रियानं सुशांतच्या खात्यातून मोठी रक्कम काढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे आज बिहार पोलीस वांद्र्यातल्या कोटक महिंद्रा बँकेत सुशांतच्या खात्यांची चौकशी करण्यासाठी पोहोचले. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बिहारमध्येच खटला चालवण्यात यावा, अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी केली आहे. या प्रकरणी सीबीआयनं तपास करावा, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. मात्र राज्य सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिला आहे. मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. तर बिहारचे पोलीस या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा प्रयत्न करतील, अशी भूमिका बिहार सरकारनं घेतली आहे.अंकिता लोखंडेला दिली जाणार पोलिस सुरक्षा? कुणापासून आहे धोका?सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा