"सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि ‘इंडिया’ला खिंडीत गाठलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 06:39 PM2024-06-25T18:39:49+5:302024-06-25T18:40:57+5:30
Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते हे कमालीचे उत्साहित आहेत. तसेच या उत्साहाचा प्रत्यय सोमवारपासून सुरू झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनावरही दिसून येत आहे. विरोधी पक्षांचं ऐक्य दाखवण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीनेलोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून ताठर भूमिका घेत सत्ताधारी एनडीएच्या उमेदवाराविरोधात आपला उमेदवार दिला आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. जेव्हा जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा काँग्रेसकडून दलितांचं नाव पुढे केलं जातं, असा आरोप चिराग पासवान यांनी सुशील कुमार शिंदे आणि मीरा कुमार यांचा उल्लेख करत केला आहे.
सोशल मीडिया साईट एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्येच चिराग पासवान म्हणाले की, जेव्हा काँग्रेस्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांना त्यांचा पराभव निश्चित असल्याचं दिसतं तेव्हा ते दलित कार्ड खेळतात. २००२ मध्ये जेव्हा त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला तेव्हा त्यांनी सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिली. तर २०१७ मध्ये जेव्हा राष्ट्रपती निवडणुकीत पराभव निश्चित दिसू लागला तेव्हा त्यांनी मीरा कुमार यांना उमेदवार बनवले. आताही त्यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी स्पष्टपणे संख्याबळ दिसत नसतानाही त्यांनी दलित नेते के सुरेश यांचं नाव समोर आणलं आहे. विरोधी पक्षांसाठी दलित केवळ प्रतिकात्मक उमेदवार आहेत का? असा सवाल चिराग पासवान यांनी विचारला आहे.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याचं निश्चित करण्यात आल्यानंतर काँग्रेसने आठ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या के. सुरेश यांचं नाव पुढे केलं. दरम्यान, काँग्रेसच्या या निर्णयावर संधीसाधू राजकारण असल्याची टीका केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना दिलं तर आम्ही अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेऊ, असे संकेत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिले आहेत.