बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आणि राजदसोबत सरकार स्थापन केले. यानंतर आता, नितीश कुमार यांनी 17 वर्षांचे नाते तोडून विश्वासघात केल्याचा आरोप भाजप खासदार सुशील मोदी यांनी केला आहे. एवढेच नाही, तर गेल्या दोन दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा नितीश यांनी अमित शहा यांना काळजी करण्याची गरज नाही, असे म्हटले होते, असा दावाही सुशील मोदी यांनी केला आहे.
माध्यमांसोबत बोलताना सुशील कुमार मोदी म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी, अमित शाह यांनी नितीश कुमारांना फोन केला होता. तेव्हा नितीश म्हणाले होते, की चिंता करण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदींनीही गेल्या दीड वर्षांत अनेक वेळा नीतिश कुमारांना फोन केला होता. मात्र, त्यांनी कधीही तक्रार केली नाही," असेही सुशीलकुमार म्हणाले.
तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजपाला वाटले होते की, विरोधी पक्ष संपुष्टात येईल. मात्र आता आम्हीही विरोधी पक्षामध्ये आहोत. त्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये येणारे २०२४ मध्ये राहतील तेव्हा ना. आम्ही राहू अथवा न राहू. पण २०२४ मध्ये ते राहणार नाहीत. मी विरोधी पक्षांना २०२४ मध्ये एकजूट होण्याचं आवाहन करतो.