पाटणा - बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना घरात घुसून मारहाण करण्याची धमकी देणा-या माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांचा सूर बदललेला दिसत आहे. तेज प्रताप यादव यांनी रविवारी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सुशील कुमार मोदींचा मुलगा उत्कर्षला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना थोड्या मस्करीच्या मूडमध्ये असणा-या तेज प्रताप यादव यांनी उत्कर्ष आपल्या पत्नीसोबत भांडणार नाही अशी अपेक्षा आहे म्हणत पाय खेचण्याचा प्रयत्न केला. महत्वाचं म्हणजे यावेळी तेज प्रताप यादव कधी सुशीलकुमार मोदींना अंकल, तर कधी गार्डियन, सिनिअर संबोधत होते.
विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी तेज प्रताप यादव यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. तेज प्रताप यादव बोलले होते की, 'मला सुशील मोदी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. जर मी तिथे गेलो तर तिथेच त्यांची पोलखोल करणार'. पण लग्नात येताच त्यांचा सगळा सूर बदललेला पहायला मिळाला.
यावेळी जेव्हा पत्रकारांनी तेज प्रताप यादव यांना तुम्ही कधी लग्न करणार असं विचारलं, तेव्हा त्यांनी सुशील कुमार मोदींकडे इशारा करत म्हटलं की, मोदी अंकलनी आपल्या मुलाचं लग्न केलं आहे आता तेच माझ्यासाठी मुलगी शोधतील.
एरव्ही संतापलेला सूर असणारे तेज प्रताप यादव यावेळी पत्रकारांशी बोलताना शांत दिसत आहे. त्यांनी सांगितलं की, सून शोधण्याची जबाबदारी आई-वडिल आणि ज्येष्ठांची असते. सुशील मोदी माझे अंकल आहेत, त्यामुळे त्यांनी मुलगी शोधली पाहिजे. मुलगी सुशील मोदी अंकलच शोधतील, पण शेवटचा निर्णय आई-वडिलच घेतील हे सांगायला ते विसरले नाहीत.
तेज प्रताप यांनी सुशील मोदींना धमकी दिल्यानंतर भाजपानेही त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. पाटणा भाजपा युनिटचे मीडिया इनचार्ज अनिल साहनी यांनी तेज प्रताप यादव यांच्या कानाखाली लगावणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं होतं. याप्रकरणी जनता दल युनायटेड बिहार युनिटचे प्रवक्ता संजय सिंह बोलले होते की, 'तेज प्रताप आपल्या वडिलांची नक्कल करत होते. त्यांच्यात हिंमत असेल तर सुशील मोदींच्या घरात घुसून दाखवावं. फक्त त्यांच्या अंगात रक्त वाहतंय आणि इतरांच्या पाणी असं नाहीये'.