सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : देशाला हादरवून टाकणाऱ्या तीन खटल्यांमधे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार मनू शर्मा (जेसिका लाल हत्याकांड) सुशील शर्मा (नैना सहानी तंदूर हत्याकांड) संतोष सिंह (प्रियदर्शिनी मट्टू बलात्कार व हत्याकांड) यांच्यासह १०८ खटल्यांतील गुन्हेगारांना मुक्त करायचे की नाही, याचा निर्णय दिल्लीच्या शिक्षा समीक्षा बोर्डाने (एसआरबी) गुरुवारी घेतला. त्यात सुशील शर्मा, मनू शर्मा व संतोषसिंह यांना उर्वरित शिक्षेतून माफी देऊन तुरुंगातून मुक्त करण्यास बोर्डाने स्पष्टपणे नकार दिला.
दिल्ली सरकारच्या सचिवालयात दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षा समीक्षा बोर्डाची बैठक दीर्घकाळ चालली. त्यात १0८ प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी २२ गुन्हेगारांच्या शिक्षेचा कालखंड पूर्ण झाल्याबद्दल त्यांना मुक्त करण्याचा निर्णय झाला. मात्र, सुशील शर्मा, मनू शर्मा व संतोषसिंह यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून तुरुंगातून मुक्त करण्यास बोर्डाने नकार दिला. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, भारतात असा नियम आहे की, कोणत्याही गुन्हेगार कैद्याला २० वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात ठेवता येत नाही. या पार्श्वभूमीवर तंदूर कांडचे गुन्हेगार सुशील शर्मा गेल्या२८ वर्षांपासून, तर जेसिका लाल हत्याकांडात गुन्हेगार ठरलेले मनू शर्मा गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात आहेत. शिक्षा समीक्षा बोर्डापुढे ही दोन नावे तुरुंगाधिकाºयांनी २४ जून रोजीच सादर केली होती. मात्र, ४ आॅक्टोबरपर्यंत त्याची सुनावणी बोर्डाने पुढे ढकलली होती. ४ आॅक्टोबरच्या बैठकीसमोर मनू व सुशील शर्मांच्या नावांखेरीज प्रियदर्शिनी मट्टू बलात्कार व हत्येचा गुन्हेगार ठरलेल्या संतोषसिंहचे नाव पहिल्यांदाच तुरुंगाधिकाºयांनी पाठवले होते. या सर्वांच्या शिक्षेबाबत बोर्डातर्फे जो निर्णय घेतला त्यास दिल्लीच्या उपराज्यपालांची संमती लागणार आहे.घृणास्पद गुन्ह्यांच्या ३ कहाण्या1 क्रूरतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करणारे तंदूर हत्याकांड दिल्लीतल्या तत्कालीन अशोका यात्री हॉटेलच्या आवारातल्या बगिया रेस्टॉरंटमधे २८ वर्षांपूर्वी उघडकीला आले. पत्नी नैना सहानीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून दिल्ली युवक काँग्रेसचा अध्यक्ष व आ. सुशील शर्माने मध्यरात्री गोळी झाडून नैनाचा खून केला.इतकेच नव्हे तर तिच्या प्रेताचे तुकडे करून बगिया रेस्टॉरंटच्या तंदूरमधे टाकून जाळण्याचा खटाटोप केला. सदर खटल्याची सुनावणी दीर्घकाळ चालल्यानंतर न्यायालयाने सुशील शर्माला फाशीची शिक्षा ठोठावली. सुप्रिम कोर्टाने फाशीची शिक्षा जन्मठेपेवर आणली.2 महरौलीच्या कुतुब कोलोनेड बार व रेस्टॉरंटमधे मध्यरात्री दारू देण्यास मनाई केल्याच्या कारणावरून १९ वर्षांपूर्वी १९९९ मध्ये मनू शर्माने गोळी झाडून जेसिका लालचा खून केला. सुनावणीत प्रत्यक्षदर्शी शयान मुन्शीसह अनेक साक्षीदार फुटले. त्याआधारे मनू शर्माला जामीनही मिळाला.यावर ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. प्रत्यक्ष सुनावणीत साक्षीदारांचे सत्य सामोरे आले. दिल्ली हायकोर्टाने मनू शर्माला २0 जानेवारी २00६ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. कालांतराने सुप्रिम कोर्टानेही या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. इतकेच नव्हे, तर मनू शर्माची पुनर्विचार याचिकाही न्यायालयाने फेटाळली. तेव्हापासून मनू शर्मा तुरुंगातच आहे.3 दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी संतोषसिंहला १९९६ साली घडलेल्या प्रियदर्शिनी मट्टू बलात्कार व हत्याकांडात २00६ मध्ये दिल्ली हायकोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली. २0१0 मध्ये सुप्रिम कोर्टाने या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले. दिल्लीचे तत्कालीन संयुक्त पोलीस आयुक्त जे.पी. सिंह यांचा पुत्र संतोषसिंहला २00६ मध्ये अटक झाली तेव्हा वकिली करीत होता.२ वर्षांपासून प्रियदर्शिनीचा पाठलाग करणारा संतोषसिंह व ती, असे दोघेही विधि शाखेचे विद्यार्थी होते. वसंतविहार येथील निवासस्थानी पोलिसांना २३ वर्षांच्या प्रियदर्शिनीचे पार्थिवच हाती आले.१९९९ साली कनिष्ठ न्यायालयाने पुराव्याअभावी संतोषसिंहची मुक्तता केली. पोलिसांनी हायकोर्टात अपील केले. २00६ मध्ये संतोषला फाशीची व २0१0 मध्ये फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.१४ वर्षे संतोषसिंह तुरुंगातच आहे. कारागृहाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन या काळात त्याच्याकडून झाले नाही म्हणून नियमानुसार तुरुंगाधिकाºयांनी संतोषसिंह याचे नाव शिक्षा समीक्षा बोर्डाकडे पाठवले.