'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 01:47 PM2024-10-20T13:47:33+5:302024-10-20T13:48:20+5:30
Sushil Kumar Shinde: तत्कालीन यूपीए-2 सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी 'भगवा दहशतवाद' म्हणत टीका केली होती.
Sushil Kumar Shinde : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमधील माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यूपीए-2 सरकारच्या काळात 'भगवा दहशतवाद' या शब्दावरुन टीका केली होती. पण, आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. युट्यूबवरील पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले की, मी तेव्हा हा शब्द वापरायला नको होता.
युट्यूबवर शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांना भगवा दहशतवाद या शब्दाच्या वापराबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'मला माझ्या पक्षाने भगवा दहशतवाद होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरुन मी तो शब्द वापरला. मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला, हे मलाही माहीत नाही. असे बोलायला नको होते. तो शब्द चुकीचा होता. ही त्या पक्षाची विचारधारा असते. पांढरा, लाल किंवा भगवा...असा कोणताही दहशतवाद नसतो,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
पीएम मोदींचे कौतुक केले
यूपीए सरकारच्या काळात दिग्विजय सिंह म्हणाले होते की, नरेंद्र मोदींना गुजरातबाहेर कोण ओळखतं? यूपीए-2 च्या काळात तुम्हाला वाटले होते की, नरेंद्र मोदी तीनवेळा पंतप्रधान होतील? यावर सुशील कुमार शिंदे म्हणाले, 'नरेंद्र मोदी कठोर परिश्रम घेतात. हिमाचलच्या निवडणुकीत मी त्यांना जमिनीवर काम करताना पाहिले आहे. आम्ही यूपीए-2 सरकारमध्ये होतो, तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की, नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि तीनदा केंद्रात सरकार स्थापन करतील. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.'