सुशीलकुमार शिंदेंकडे काँग्रेस अध्यक्षपद?, गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:04 AM2019-07-01T05:04:09+5:302019-07-01T05:04:40+5:30
देशभर सध्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत १४० काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधी तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देशभर सध्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत १४० काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळाला. विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यास आवश्यक असलेले संख्याबळ यावेळीही काँग्रेसकडे नसल्याने, त्या पदापासूनही पक्षाला वंचित राहावे लागणार आहे. राहुल गांधी यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, म्हणून काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत शशी थरूर व अन्य खासदारांनी केलेली विनंती त्यांनी अमान्य केली.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारिणीकडे सोपवून महिना उलटला, तरी यावर काँग्रेस कार्यकारिणीने अद्याप तोडगा काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक उद्या, सोमवारी दिल्लीत होत आहे. या बैठकीकडे साºयांचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी निर्णयावर ठाम असून सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा येण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्याबरोबरच मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, जनार्दन द्विवेदी, ए. के. अॅन्टोनी, मुकुल वासनिक ही नावे चर्चेत होती. मात्र, सुशीलकुमारांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी पसंतीची मोहोर उमटविल्याचे समजते.
गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू
राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले शिंदे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून, त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्रिपद सांभाळले आहे. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.