नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 57 मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात शपथ मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या नवीन मंत्रिमंडळात काहींना डच्चू मिळाला तर काहींनी नव्याने संधी मिळाली. अरुण जेटली, सुषमा स्वराज हे ज्येष्ठ नेतेही तब्येतीच्या कारणामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात नाही. गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर सुषमा स्वराज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत त्याचसोबत ट्विटवरुन त्यांनी परराष्ट्र मंत्री उल्लेख हटविला आहे.
सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, पंतप्रधान मोदीजी, आपण मला 5 वर्ष परराष्ट्र मंत्री म्हणून देशवासियांची आणि परदेशातील भारतीयांची सेवा करण्याची संधी दिली. या पाच वर्षाच्या काळात मला वैयक्तिक स्तरावर खूप सन्मान दिला. मी त्याबद्दल आपली आभारी आहे. आपलं सरकार यशस्वीरित्या पुढे चालेल. हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात सुमारे साडेसहा हजार मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नाव घोषित करण्यात आले आणि त्याबरोबर सर्व बाजूंनी मोदी यांच्या जयजयकाराला सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि त्यांच्या ५७ सहकाऱ्यांना मंत्री व राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. या शपथविधी समारंभास आलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता. ठरल्याप्रमाणे रात्री ९ वाजता शपथविधी समारंभाची सांगता झाली.
या मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश हे मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे. मात्र या वेळी अरुण जेटली व सुषमा स्वराज यांचा प्रकृतीच्या कारणास्तव समावेश नाही. जे. पी. नड्डा, विजय गोयल, जयंत सिन्हा, राजीव प्रताप रुडी, के. अल्फान्स, मनेका गांधी व महेश शर्मा, राज्यवर्धन राठोड यांच्यासह गेल्या मंत्रिमंडळातील ३0 जणांना यंदा स्थान मिळालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा वाटा एकने कमी झाला असून सात जणांना संधी देण्यात आली आहे. त्यात विद्यमान मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विदर्भातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पदाची संधी देण्यात आली.