नवी दिल्ली, दि. 22- पाकिस्तानमधील एका महिलेने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या घरातील मुलाच्या उपचारासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मेडिकल व्हिसाची मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले. गेल्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लता शारदा यांनी घरातील एका व्यक्तीच्या उपचारासाठी मेडिकल व्हिसा, मिळावा यासाठी सुषमा स्वराज यांच्याकडे आग्रह धरला होता.
पाकिस्तानमधील लता शारदा यांनी सोमवारी मेडिकल व्हिसासाठी अर्ज मंजूर झाल्याचं ट्विटरवरून सांगितलं. पाकिस्तानमधील त्या महिलेचं ट्विट सुषमा स्वराज यांनी मुलाच्या फोटोसह रिट्विट केलं आहे. या पाकिस्तानी महिलेने मुलाचं भारतात तात्काळ बोनमॅरो उपचार करण्यासाठी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. यासाठी आपण संपूर्ण मदत करणार असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं होतं.
सुषमा स्वराज तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होत्या; पाकिस्तानी महिलेचं ट्विटएका पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांच्यासाठी ट्विट केलं होतं. या महिलेने ट्विटमध्ये सुषमा स्वराज पाकिस्तानच्या पंतप्रधान असण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'तुम्हाला खूप सारं प्रेम आणि आदर. जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असत्या तर आमचा देश आज बदलला असता', असं ट्विट पाकिस्तानी महिला हिजाब आसिफ यांनी केलं होतं. पाकिस्तानमधील एका व्यक्तीला उपचारासाठी भारतात यायचं होतं. पण त्या व्यक्तीचं वैद्यकिय व्हिसासाठीचा अर्ज अडकून पडला होता. या व्यक्तीच्या मदतीसाठी हिजाब आसिफ यांनी ट्विटरवर सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. सुषमा स्वराज यांनी हिजाबला नाराज न करता लगेचच कारवाई करत भारतीया दूतावासाला या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले. भारतीय दूतावासाने एक ट्विट करत हिजाबला आश्वासन दिलं की त्यांची विनंती लक्षात ठेवून कारवाई केली जाते आहे. सुषमा स्वराज यांनी हिजाब यांच्या मदतीसाठी दाखवलेली तत्परता हिजाबला चांगलीच भावली आणि तिने आनंदीत होऊन ट्विट केलं. एका दुसऱ्या ट्विटमध्ये सुषमा स्वराज यांचे आभार मानताना हिजाबने म्हंटलं आहे. तुम्हाला मी नेमकं काय म्हणू ? सुपरवूमन म्हणू की देव म्हणू ? तुम्ही केलेल्या मदतीसाठी आभार मानायला मला शब्द कमी पडत आहेत. तुम्हाला खूप प्रेम. आज तुम्हाला धन्यवाद देताना माझ्या डोळ्यात आनंदाश्रृ आहेत आणि माझं तोंड तुमची सुस्ती करणं बंद करत नाहीये, असं म्हणत त्या महिलेने सुषमा स्वराज यांची स्तुती केली होती.