नवी दिल्ली - ट्विटरच्या माध्यमातून नेहमी सक्रीय असणा-या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा आपल्यातील कटू संबंधांना आड येऊन न देता पाकिस्तानी नागरिकांना मदत केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही ताणलेले असून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करताना सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत जागा दाखवून दिली होती. मात्र याचा परिणाम सुषमा स्वराज यांनी नागरिकांवर तसंच आपल्या कामावर होऊ दिलेला नाही. मेडिकल व्हिसासाठी विनंती करण-या दोन पाकिस्तानी नागरिकांना सुषमा स्वराज यांनी काही तासात उत्तर देत व्हिसा देण्याचं आश्वासन दिलं.
लाहोरमधील उजैर हुमायून यांनी आपल्या तीन वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होती. त्यांच्या मुलीला ह्रदयाचा आजार असून त्यासाठी त्यांना भारतात येऊन उपचार करायचे होते. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे व्हिसासाठी विनंती केली होती. 'माझ्या तीन वर्षाच्या मुलीची हार्ट सर्जरी करणं गरजेचं आहे. कृपया आम्हाला व्हिसा द्यावा. आम्ही तुमचे आभारी राहू', असं ट्विट त्यांनी केलं होतं.
सुषमा स्वराज यांनी तात्काळ ट्विटला उत्तर देत व्हिसा देण्याचं आश्वासन दिलं. 'तुमच्या तीन वर्षाच्या मुलीवर भारतात उपचार करण्यासाठी आम्ही व्हिसा देत आहेत. लवकरात लवकर तिची तब्बेत सुधारावी यासाठी आम्हीदेखील प्रार्थना करतो', असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं.
यानंतर काही मिनिटातच सुषमा स्वराज यांनी दुस-या एका पाकिस्तानी नागरिकाला उत्तर देत मेडिकल व्हिसा देत असल्याचं सांगितलं. यकृत प्रत्यारोपणाकरिता पाकिस्तानी नागरिकाला व्हिसा हवा होता. नूरमा हबिब यांनी 6 ऑक्टोबर रोजी ट्विट करत सुषमा स्वराज यांच्याकडे वडिलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होती. त्यांच्या ट्विटलाही सुषमा स्वराज यांनी उत्तर देत तुम्हाला व्हिसा देत असल्याचं सांगितलं.
सुषमा स्वराज यांनी सीमारेषेपलीकडील नागरिकांना मदत करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा सुषमा स्वराज यांनी वैद्यकीय उपचारासाठी पाकिस्तानी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुषमा स्वराज यांनी कॅन्सरशी झुंज देणा-या पाकिस्तानी महिलेला व्हिसा दिला होता. सोशल मीडियाचा पुरेपूर आणि व्यवस्थित वापर सुषमा स्वराज करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला सुनावतानाही त्या मागे पुढे पाहत नाहीत. पाकिस्तानी नागरिकांनी मेडिकल व्हिसासाठी पत्र न देणा-या सरताज अझिझ यांना सुषमा स्वराज यांनी चांगलंच सुनावलं होतं.