नवी दिल्ली- पासपोर्ट हरवला, कोणी संकटात सापडलं की सरळ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्वीट करायचं आणि मोकळं व्हायचं असा शिरस्ता झालेला आहे. परराष्ट्र खात्याकडे मदत मागण्यासाठी सुषमा स्वराज यांचे ट्वीटर हँडल हे एक हक्काचे स्थान झाले आहे. स्वराज परराष्ट्रमंत्रीपदी आल्यापासून देशातील आणि परदेशातील अनेक लोकांनी त्यांची ट्वीटरवर मदत मागितली आहे. स्वराज यांनीही त्या लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
पासपोर्ट हरवण्याचा आणखी एक प्रसंग काल घडला असून त्या व्यक्तीला मदत करताना परराष्ट्रमंत्र्यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. देवता रवी राजा नावाच्या एका व्यक्तीने काल ट्वीट करत आपला विवाह 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान असून आपण 10 ऑगस्टरोजी प्रवासाला निघणार आहोत असे सांगितले. मात्र आपला पासपोर्ट हरवला आहे, आता तुम्ही एकमेव आशास्थान आहात असे त्याने कळवले. सुषमा स्वराज यांनी या ट्वीटची तात्काळ दखल घेतली आणि त्याला त्यांनी मदत करण्याचे आश्वासव तर दिलेच त्याहून मजेशिर शब्दांमध्ये त्याची फिरकीही घेतली. तुम्ही अगदीच चुकीच्या वेळेस पासपोर्ट हरवला आहे, पण आम्ही तुम्हाला विवाहास योग्य वेळेत पोहोचण्यासाठी मदत करु असे ट्वीट त्यांनी केले. व त्यामध्ये अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाला टॅग करुन देवता याला मदत करण्यास सूचित केले. सुषमा स्वराज यांच्या ट्वीटला तात्काळ जगभरातून शेकडो लाईक्स आणि रिट्वीट करत लोकांनी प्रतिसाद दिला. सुषमा स्वराज यांच्या ट्वीटरवर जगभरातून मदतीसाठी लोक विनंती करत असतात. परदेशात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शोकाकूल आप्तांना मदत करण्यासाठी सुषमा स्वराज ट्वीटरवर तात्काळ तयार असतात.