ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींची मदत केल्याप्रकरणी गोत्यात आलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची पक्षश्रेष्ठींकडून पाठराखण केली जात असली तरी भाजपा खासदाराचे ट्विटने या वादाला नवीन वळण दिले आहे . भाजपातील अस्तनीतले साप व एक ख्यातनाम पत्रकाराने सुषमा स्वराज यांच्याविरोधात कट रचल्याचे ट्विट खासदार किर्ती आझाद यांनी केले आहे.
घोटाळ्यात गुंतलेले आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना ब्रिटनमध्ये प्रवासासाठी दस्तऐवज उपलब्ध करवून दिल्याबद्दल विदेशमंत्री सुषमा स्वराज वादाच्या भोव-यात अडकल्या आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह आदी ज्येष्ठ नेत्यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली आहे. पण सुषमा स्वराज वादामागे पक्षांतर्गत मंडळीचा हात असावा अशी शंका किर्ती आझाद यांच्या ट्विटमधून येते. आझाद यांनी केलेल्या ट्विटमध्ये भाजपातील अस्तनीचे साप व पत्रकारांनी हे षडयंत्र रचल्याचे म्हटले आहे. किर्ती आझाद यांनी स्वतःदेखील सुषमा स्वराज यांचे समर्थन केले आहे.
स्वराज यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांचा कडाडून विरोध दर्शवला होता. आझाद यांचा रोख कोणाच्या दिशेने आहे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील किर्ती आझाद यांच्या विधानाते अप्रत्यक्षपणे समर्थन केले. 'किर्ती आझाद हे माझे चांगले मित्र आहेत, ते जे बोलतात ते विचार व अभ्यास करुनच बोलतात' अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.