नवी दिल्ली : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भावूक होत त्यांना श्रद्धांजली वाहिली. लालकृष्ण अडवाणी म्हणाले, 'सुषमा या दिग्गज राजकीय नेत्या आणि एक माणूस म्हणून उत्तम होत्या. त्या नेहमीच आठवणीत राहतील आणि त्यांची उणीव भासत राहील.' तसेच, माझ्या वाढदिवसाला आवडीचा केक आणण्यास त्या कधीच विसरल्या नाहीत, असे सांगत लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला.
'माझ्या खूपच जवळच्या सहकारी सुषमा स्वराज यांच्या अकस्मिक निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. भाजपामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मी त्यांच्यासोबत काम केले आहे. 1980 मध्ये मी भाजपाचा अध्यक्ष असताना त्या युवा कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या. त्यांना मी माझ्या टीममध्ये सहभागी करून घेतले. जसजसे दिवस गेले तसे त्या आमच्या पार्टीच्या लोकप्रिय नेत्या बनल्या आणि इतर महिला नेत्यांसाठी त्या रोल मॉडल होत्या,' असेही लालकृष्ण अडवाणी म्हणाले.
याचबरोबर, सुषमा स्वराज एक उत्तम वक्त्या होत्या. अनेक घटना आठवणीत ठेवणाची त्यांची क्षमता पाहून मला आश्चर्य वाटत होते. त्यांच्यामध्ये अनेक घटना स्पष्ट आणि चांगल्या लक्षात ठेवण्याची क्षमता होती. असा एक वर्षही गेला नाही की त्यांनी माझ्या वाढदिवशी आवडता चॉकलेट केक आणला नाही, असे सांगत लालकृष्ण अडवाणींनी सुषमा स्वराज यांच्या विषयींच्या स्मृतींना उजाळा दिला.
भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 1975 मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.
सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीत 1999मध्ये मोठी उलथापालथ झाली. त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातल्या बेल्लारीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपानं जाणूनबुजून सोनिया गांधींविरोधात त्यांना उभं केलं होतं. त्याच्यामागेही एक कारण होतं. भाजपानं परदेशी सून आणि भारताची मुलगी अशी प्रचाराची रणनिती आखली होती. पण निवडणुकीत सुषमा स्वराज यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपाची ती रणनिती बेल्लारीच्या लोकांवर फार प्रभाव पाडू शकली नाही.
नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. त्यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातही आपला वेगळा ठसा उमटवला.