नवी दिल्ली - माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
सुषमा स्वराज देशातील अशा नेत्या होत्या ज्यांचा मित्रपरिवार सगळ्या पक्षात होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. सुषमा स्वराज यांच्या निधनाचं मी दु;ख व्यक्त करतो आणि स्वराज यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यासाठी प्रार्थना करतो असं राहुल गांधी यांनी सांगितले.
माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.
सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.
राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.