नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतालाच नाही तर पाकिस्तानामध्ये कराचीत राहणाऱ्या एका कुटुंबाला देखील दु:ख झाले आहे.
त्यांनी परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी ट्विटरवर सक्रिय राहून परदेशात राहणाऱ्या भारतीयांची मदत केलीच, पण इतर देशातील रहिवाशांना व्हिजा संबंधीत प्रश्नावर देखील त्यांनी मदत केली होती.
त्यामध्ये पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या युसामा खान यांचा देखील समावेश आहे. युसामा खान आणि त्याच्या पत्नीला ऑक्टोबर 2016मध्ये त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला ह्दयविकाराच्या उपचारासाठी भारतातील नोएडाच्या रुग्णालयात आणायचे होते. मात्र भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये जास्त तणाव निर्माण झाल्याने व्हिजा मिळणे कठीण झाले होते. तसेच मुलीची तब्येत खालावल्याने लवकर उपचार करणे गरजेचे होते.
त्यानंतर युसामाला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज एका ट्विटने लोकांची मदत करतात अशी माहिती एका व्यक्तीने दिली. त्यानंतर सिराजने ट्विटर अकाउंट चालू करुन थेट सुषमा स्वराज यांना ट्विट केले. त्यानंतर काही दिवसातच त्याला भारत उच्च आयोगकडून फोन करुन व्हिजा उपलब्ध करुन देण्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर युसामाच्या परिवाराला भारतात येण्यासाठीचा व्हिजा मिळाला आणि मुलीवर उपचार करणे शक्य झाले.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (६७) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.