नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.
त्याचप्रमाणे सुषमा स्वराज यांची प्रेमकहीनी देखील तितकीच रंजक होती. त्यांचा जन्म14 फेब्रवारी 1952मध्ये हरियाणात झाला. पण त्यावेळी हीच मुलगी भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगाभरात नाव मोठं करेल याचा विचार सुद्धा केला नसेल.
सुषमा स्वराज यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांना देखील घरातूनच संघाचे ज्ञान मिळत गेले. त्याचप्रमाणे त्यांनी संस्कृत व राजकारणाचे धडे अंबाला कॅटच्या सनातन धर्म महाविद्यालयातुन घेतले. त्यानंतर पंजाब युनिव्हर्सिटीमधून लॅा चे शिक्षण पूर्ण केले. तसेच सुषमा स्वराज यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलाची भूमिका देखील निभावली आहे.
रिपोर्ट्सनुसार, सुषमा स्वराज लॅा चे शिक्षण घेत असतानाच त्यांची स्वराज कौशल यांच्यासोबत भेट झाली. मात्र हरियाणात मुलीला प्रेम विवाह तर सोडा तसा विचार करणे देखील दूरची गोष्ट होती. कारण हरियाणा राज्य स्त्री- पुरुष यांच्यामध्ये भेदभाव करण्यासाठी ओळखले जाते.
1975मध्ये समाजसेवक जॅार्ज फर्नांडिसच्या समुहात सुषमा स्वराज सामील झाल्या होत्या. या समुहात स्वराज कौशल देखील होते. या दोघांनी आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढत गेल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतू त्यांना घरातून विरोध करण्यात आल्याने दोघांना आपल्या परिवाराला पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. यानंतर 13 जुलै 1975मध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. तसेच यामध्ये महत्वाची बाब म्हणजे सुषमा स्वराज यांनी आपल्या पतीचे नावालाच आडनाव बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.