नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्यावर दिल्लीतील लोधी स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी त्यांचा अंत्यविधी केला. यावेळी स्वराज यांच्या कुटुंबीयांसह उपस्थितांना आपल्या भावनांना आवर घालता आला नाही.
यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आदी उपस्थित होते. उपस्थित होते.
सुषमा स्वराज (६७) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले होते. सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृतीचे कारण देत त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णयजाहीर केला होता. तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.
सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. १९७३ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरूकेली. १९७५ मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.