नवी दिल्ली : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. काल रात्री 9 च्या सुमारास सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. पूनम महाजन यांनी ट्विटच्या माध्यमातून 'फूल भी थी, चिंगारी भी।' अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. याचबरोबर, सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाच्या नेत्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 1975 मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.
सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीत 1999मध्ये मोठी उलथापालथ झाली. त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातल्या बेल्लारीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपानं जाणूनबुजून सोनिया गांधींविरोधात त्यांना उभं केलं होतं. त्याच्यामागेही एक कारण होतं. भाजपानं परदेशी सून आणि भारताची मुलगी अशी प्रचाराची रणनिती आखली होती. पण निवडणुकीत सुषमा स्वराज यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपाची ती रणनिती बेल्लारीच्या लोकांवर फार प्रभाव पाडू शकली नाही.
नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. त्यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातही आपला वेगळा ठसा उमटवला.