नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वातील खेळाडूंनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ''सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने खुप दु:ख झाले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो" असे कोहली म्हणाला.
त्याचप्रमाणे 'मी श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले. एक जेष्ठ नेत्या व भाजपाची आधारस्तंभ असणारी व्यक्ती गमावल्याचे भारताचा माजी क्रिकटपटू व खासदार गौतम गंभीरने सांगितले.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (६७) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.