नवी दिल्लीः माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपा सरकारच्या कार्यकाळात स्वराज यांनी अनेक मंत्रालयांवर स्वतःची छाप उमटवली होती. स्वराज यांचा परराष्ट्र खात्यावर जास्त प्रभाव होता. त्या मंत्री असताना फक्त एका ट्विटवर परदेशातल्या कोणत्याही कोपऱ्यातील भारतीयाला मदत करायच्या. परदेशातल्या प्रत्येक भारतीयाची समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी पुढे यायच्या.
एखाद्या व्यक्तीनं त्यांना टॅग करून अडचण सांगितल्यास ती सोडवण्याची त्या आटोकाट प्रयत्न करायच्या. सुषमा स्वराज ट्विटरवर सक्रिय होत्या. त्या परराष्ट्रमंत्री असताना ट्विटरवर आलेल्या तक्रारींचे लगेच निवारण करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. ट्विट करून कुणी मदत मागितली तर त्या लगेच ती करायच्याही. पण कोणी खोडी काढली तर त्या व्यक्तीवर तुटूनही पडायच्या.
ट्विटरवर त्यांचे 131 लाख फॉलोअर्स होते. स्वराज यांचे ट्विटर हँडल टॅग करून अनेकदा परदेशातील भारतीय त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसासंदर्भातील विचारणा करत होते. पाकिस्तानातीन अनेक रुग्णांसाठीही त्यांनी दोन्ही देशांतील संबंध बाजूला ठेवून मदत केली. स्वराज या स्थानिक भारतीय दूतावासाचे ट्विटर हँडल टॅग करून संबंधित व्यक्तीची अडचण दूर करायच्या.
1. एकानं 24 जानेवारीला इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांचा व्हिडीओ स्वराज यांना टॅग करून ट्विट केला होता. स्वराज यांनी 19 फेब्रुवारीला दिले उत्तर
2. एका व्यक्तीच्या भावाची दोहा विमानतळावरून सुखरुप सुटका केली.
3. आमच्या यूएईमधील दूतावासाशी बोलणं झालं आहे. यूएईतून तरुणीची केली सुटका
4. येमेनमधून भारतीय महिलेची तिच्या आठ महिन्यांच्या बाळासह केली सुटका
5. बर्लिनमध्ये एकाचा पासपोर्ट आणि पैसे हरवल्यानंतर केलेली मदत
6. एव्हरेस्टवर अडकलेल्या 15 भारतीयांची तात्काळ दखल घेत केली होती सुटका
7. दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गमधून भारतीय महिलेची केली होती सुखरूप सुटका
8. ऋषिकेशमध्ये हरवलेल्या डच महिलेला वाचवलं होतं
9. शहीद जवानाच्या भावाला केली होती मदत
10. बालीमधील अपघातग्रस्त महिलेला दिला होता मदतीचा हात