देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचं अकाली निधन देशवासीयांना चटका लावून गेलंय. आईसारखं हळवं मन असलेल्या, पण प्रसंगी रणरागिणीचं रूप घेऊन अनेक लढाया जिंकणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या अनेक आठवणी, भाषणं, ट्विट्स सगळ्यांच्या डोळ्यांपुढून झरझर सरकताहेत. अशावेळी त्यांच्यासोबत अनेक वर्षं काम केलेल्या नेतेमंडळींची, कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल? सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना कुणालाच अश्रू आवरता येत नाहीएत. स्वराज यांचं पार्थिव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी जागच्या जागी हात जोडून स्तब्ध उभे राहिले. त्यांचे डोळे पाणावले आणि हुंदकाही अनावर झाला. सुषमा स्वराज यांच्या कन्येच्या - बांसुरी स्वराज यांच्या डोक्यावर हात ठेवून मोदींनी त्यांना धीर दिला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सुषमा स्वराज यांना गुरुस्थानी असलेले लालकृष्ण अडवाणी यांच्या मनातील दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाकडे ते एकटक पाहत होते. हे असं काही झालंय, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
सुषमा स्वराज यांच्या निधनाने राजकारणातील तेजस्वी अध्याय समाप्त झाला आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्यात. जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या एका उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु: खी आहे. कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. सुषमा स्वराज या जबरदस्त वक्त्या होत्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. पक्षाच्या पातळीवर त्यांचा नेहमीच आदर आणि सत्कार केला आहे.
'अजातशत्रू' राजकीय नेते हल्ली सापडणं कठीण झालं आहे. परंतु, सुषमा स्वराज यांनी राजकीय विरोध एका बाजूला ठेवून सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. त्यामुळेच विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनाही सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी स्वराज यांची चांगली मैत्री होती. त्यांनीही स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.