नवी दिल्ली - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांना रात्री 9 च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच देशाने लाडकी लेक गमावली असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
'सुषमा स्वराज यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झालं आहे. देशाने आपली लाडकी लेक गमावली आहे. सुषमा स्वराज धाडस आणि निष्ठेचं मूर्तीमंत उदाहरण होत्या. लोकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. त्यांची सेवा आणि योगदान देश विसरणार नाही' असं ट्वीट रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. 'सुषमा स्वराज यांच्या निधनाने भाजपा आणि भारतीय राजकारणाची अपरिमीत हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो' असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.
सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.
काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरूकेली. 1975 मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.
सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीत 1999मध्ये मोठी उलथापालथ झाली. त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातल्या बेल्लारीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपानं जाणूनबुजून सोनिया गांधींविरोधात त्यांना उभं केलं होतं. त्याच्यामागेही एक कारण होतं. भाजपानं परदेशी सून आणि भारताची मुलगी अशी प्रचाराची रणनिती आखली होती. पण निवडणुकीत सुषमा स्वराज यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपाची ती रणनिती बेल्लारीच्या लोकांवर फार प्रभाव पाडू शकली नाही.
नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. त्यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातही आपला वेगळा ठसा उमटवला.