ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 24 वर्षीय तरुणाला व्हिसा देत असल्याचं जाहीर केलं आहे. सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे की, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांच्या पत्राची काहीही गरज नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचा एक अविभाज्य घटक असून, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे तिथे कब्जा केला आहे असंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नागरिकाला व्हिसा देत सुषमा स्वराज यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं असून, त्याचवेळी पाकिस्तानला आरसा दाखवण्याचं काम केलं असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहणारा 24 वर्षीय ओसामा अली याला उपचारासाठी भारतात यायचं आहे. मात्र त्याला पाकिस्तानकडून कोणतीही परवानगी दिली जात नव्ही. ओसामाच्या यकृतामध्ये गाठ असून उपचारासाठी त्याला दिल्लीला यायचं आहे. यासाठी नियमांचं पालन करत प्रक्रियेप्रमाणे त्याला सरताज अजीज यांना पत्र लिहायचं होतं, आणि ते पत्र भारतीय दुतावासामध्ये द्यायचं होतं. पण त्याने असं काही केलं नाही, त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण होत होती. अशावेळी सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत ओसामाला मदत केली. त्यांनी ओसामाला कोणत्याही पत्राविना उपचारासाठी मेडिकल व्हिसा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वी सुषमा स्वराज यांनी पाकिसतानी नागरिकांना भारतात उपचारासाठी यायचं असले तर सरताज अझीझ यांचं पत्र आणणं अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं. पत्र आणल्यास तात्काळ व्हिसा देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र या प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कोणत्याही पत्राविना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसंच सुषमा स्वराज यांनी चुकीच्या बातम्या प्रसारित करत असल्याने सरताज अझीझ यांना सुनावलं होतं. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा नाकारल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून चुकीचे आरोप लावण्यावरुन पाकिस्तानला सुनावलं होतं. सुषमा स्वराज यांनी ट्विट करत पाकिस्तानला आरसा दाखवला होता. याचवेळी सुषमा स्वराजांनी कुलभूषण जाधव यांचाही मुद्दा उचलच सरताज अझीझ यांना त्यांच्याच भाषेत ऐकवलं होतं.
कुलभूषण जाधव यांच्या आईने व्हिसासाठी अर्ज करुनही साधी त्याची दखलही न घेतल्याबद्दल केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे सरताज अझीझ यांना चांगलंच धारेवर धरत खडे बोल सुनावले.
पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा मिळत नसल्याच्या मागे सरताज अझीझ कारणीभूत असल्याचं सुषमा स्वराज बोलल्या होत्या. पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यामध्ये भारताला कोणतीही समस्या नसून आनंदच आहे, मात्र यासाठी अझीझ यांनी देशाच्या नागरिकांसाठी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचं सुषमा स्वराज बोलल्या होत्या.