ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - आंतरराष्ट्रीय कोर्टात झालेला पाकिस्तानचा पराभव त्यानंतर नियंत्रण रेषेवर भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी चौक्या यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पण अशा परिस्थितीतही भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उज्मा अहमदच्या भारत वापसीबद्दल पाकिस्तानचे आभार मानले आहे. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानलाही उज्माच्या भारतवापसीचे श्रेय देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मानवतेच्या आधारावर पाकिस्तानने उज्माला भारतात परतण्यास जी मदत केली त्याबद्दल मी पाकिस्तान सरकार आणि न्याययंत्रणेचे आभार मानते असे सुषमा म्हणाल्या.
पाकिस्तानच्या परराष्ट्र आणि गृहमंत्रालयाने जे सहकार्य केले त्यामुळे उज्मा आज भारतात आहे. मी उज्माचा खटला लढवणारे वकिल शहानवाज नून यांचे आभार मानते. त्यांनी उज्माचे वडिल असल्यासारखे हा खटला लढवला आणि न्यायालयापुढे तिची बाजू योग्यपद्धतीने मांडली असे सुषमा यांनी सांगितले. बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडण्यात आलेली उज्मा आज मायदेशी परतली. बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्माला मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती, तसेच पोलिसांना तिला वाघा सीमेपर्यंत सोडण्याचे आदेश दिले होते.
भारतात परतल्यानंतर उज्माने आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उज्माने तिचा अनुभव कथन केला. विवाह करुन पाकिस्तानात गेलेल्या महिलांना मी पाहिले आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. प्रत्येक घरात एका पुरुषाला दोन-तीन, चार बायका असतात. आणखी काही दिवस मी तिथे राहिले असते तर, माझा मृत्यू झाला असता. फिलिपाईन्स, मलेशिया या देशातून महिलांना प्रेमामध्ये फसवून पाकिस्तानात आणले जाते. अशा अनेक महिला आज पाकिस्तानमध्ये अडकल्या आहेत असे उज्माने सांगितले.
उज्माने तिची सुटका केल्याबद्दल भारतीय दूतावासाला धन्यवाद दिले. भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मी आभार मानते. त्यांनी मला आशा आणि जगण्याला कारण दिले. मला मिळालेल आयुष्य अमुल्य आहे याची मला त्यांनी जाणीव करुन दिली. त्यामुळे मी परिस्थितीशी लढाई करु शकले असे उज्माने सांगितले. भारतीय दूतावासात जाऊन माझी परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी लगेच माझ्यावर विश्वास ठेवला ही मोठी गोष्ट आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मला हिम्मत दिली. त्यांच्यामुळे आज मी सुरक्षित, सुखरुप असून तुमच्याशी बोलू शकतेय असे उज्मा अहमदने सांगितले.
Uzma is here also bcoz of cooperations of Pak's foreign&home ministries,I thank lawyer Shahnawaz Noon who fought her case like a father: EAM pic.twitter.com/yqx31tOsXe— ANI (@ANI_news) May 25, 2017