देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. गेले बरेच महिने त्या आजारी होत्या, पण असं काही होईल, हे कुणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. स्वाभाविकच, त्यांचं जाणं सगळ्यांनाच चटका लावून गेलंय. सुसंस्कृत, अभ्यासू, विश्वासू, कर्तव्यतत्पर राजकारणी देशानं गमावल्याची भावना व्यक्त होतेय. सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना प्रसारमाध्यमांमधून, नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून, सोशल मीडियावरून उजाळा दिला जातोय. अशीच एक, सुषमा स्वराज यांच्या मनाचा मोठेपणा दाखवणारी आठवण म्हणजे त्यांनी मागितलेल्या माफीची.
वास्तविक, 'सॉरी' म्हणायला खूप धाडस लागतं. आजच्या राजकारणात तर गंभीर चुका करणारी मंडळीही माफी मागायला तयार होत नाहीत. त्यांचा अहंकार दुखावतो. परंतु, अनेक महत्त्वाची पदं, जबाबदाऱ्या सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांनी, आपली चूक लक्षात येताच जाहीर माफी मागायलाही मागेपुढे पाहिलं नव्हतं. विशेष म्हणजे, त्यावेळी त्या केंद्रीय परराष्ट्र मंत्री होत्या.