नवी दिल्ली- दिवाळीच्या दिवशी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीला व्हिसा दिला जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण ही घोषणा करत असल्याचंही स्वराज यांनी सांगितलं. पाकिस्तानमधील अनेक नागरिक वैद्यकीय मदतीसाठी स्वराज यांच्याकडे ट्विटरवरुन मदत मागत असतात. त्याची दखल घेत सुषमा स्वराज यांनी ट्विटकरून पाकिस्तानी नागरिकांना हे दिवाळी गिफ्ट दिलं आहे.
भारतात येण्यासाठी मेडिकल व्हिसा मिळावा यासाठी पाकिस्तानातील अनेक नागरिकांनी सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विट करून मागणी केली होती. त्यांच्या ट्विटला उत्तर देत सुषमा स्वराज यांनी व्हिसा देणार असल्याचं सांगितलं होतं. सुषमा स्वराज यांनी केलेल्या मदतीसाठी पाकिस्तानातील अनेक महिलांनी स्वराज यांचं ट्विटरवर कौतुक केलं होतं. आता पुन्हा सुषमा स्वराज यांनी ट्विट करून पाकिस्तानातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे.
पाकिस्तानच्या कराचीमधील आमना शमीम हिने ट्विटरवरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. मॅडम कृपया मला व्हिसा द्या. माझा पती आधीपासून दिल्लीमध्ये असून ते लिव्हरच्या आजारावर उपचार घेत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी तेथे कोणीही नसून मला तेथे जायचं आहे. मी दिल्लीला गेल्यावर माझा भाऊ परत येइल, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं होतं. या ट्विटला उत्तर देत सुषमा स्वराज यांनी त्या महिलेला पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क करायला सांगतिलं होतं.
याआधी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर अनेक पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसासाठी मदत केली आहे. इतकंच नाही, तर विदेशात अडकलेल्या आणि इतर प्रकरणातही ट्विटरवरून मदत मागितलेल्या लोकांना सुषमा स्वराज यांनी मदत केली आहे.