ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / नवी दिल्ली, दि. 3 - ह्रदयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पाकिस्तानमधील एका अडीच वर्षाच्या मुलाला भारताने मेडिकल व्हिसा जारी केला आहे. मुलाच्या वडिलांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे व्हिसासाठी हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केली होती. यानंतर सुषमा स्वराज यांनी तात्काळ पाऊलं उचलत त्यांना मदत केली. मुलाच्या वडिलांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती.
पाकिस्तानी नागरिक केन सीड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्याकडे आपल्या मुलाला मेडिकल व्हिसा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मुलाला ह्रदयाचा आजार असून पाकिस्तानात उपचाराची काहीच सोय नाही.
यानंतर सुषमा स्वराज यांना ट्विटची दखल घेत "मुलाला त्रासाला सामोरं जावं लागणार नाही. पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधा, आम्ही मेडिकल व्हिसा देऊ" असं सांगितलं. हे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
No. The child will not suffer. Pls contact Indian High Commission in Pakistan. We will give the medical visa. pic.twitter.com/4ADWkFV6Hthttps://t.co/OLVO3OiYMB— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 31, 2017
व्हिसा मिळाल्यानंतर मुलाच्या वडिलांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले. "इतके मतभेद असतानाही तुम्ही माणुसकी दाखवलीत हे पाहून चांगलं वाटलं. तुमच्या प्रयत्नांनसाठी आभार. माणुसकी जिंकली आहे. देव सर्वांना सुखी ठेवो", असं ट्विट त्यांनी केलं.
भारतात मुलावर उपचार करता यावेत यासाठी कुटुंबाला चार महिन्यांसाठी मेडिकल व्हिसा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय दुतावासातील अधिका-याने दिली आहे.