नवी दिल्ली - 'दहशतवादाविरोधातपाकिस्तानने कठोर पावलं उचलावीत. जोपर्यंत पाकिस्तानदहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही' असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 'दहशतवाद आणि चर्चा एकत्र केली जाऊ शकत नाही. जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार असतील तर मग त्यांनी मसूद अजहरला भारताकडे सोपवावं' असं स्वराज यांनी म्हटलं आहे. 'इंडियाज वर्ल्ड: मोदी गव्हर्नमेंट्स फॉरेन पॉलिसी’ या कार्यक्रमाचे बुधवारी (13 मार्च) आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये वारंवार अडथळा आणणाऱ्या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं मत यावेळी सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं. तसेच 'जर पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर आश्रय मिळालेल्या दहशतवादी संघटनांवर कारवाई केली तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतात. आम्हाला दहशतवादावर चर्चा नको आहे, तर कारवाई हवी आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही' असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे
सुषमा स्वराज यांनी भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने दिलेल्या प्रतिक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘पाकिस्तानी लष्कर जैश-ए-मोहम्मदच्या वतीने आमच्यावर हल्ला का करत आहे ? तुम्ही जैश-ए-मोहम्मदला आपल्या जमिनीवर फक्त आश्रय देत नाही तर त्यांना पैसेही पुरवता. जेव्हा पीडित देश याचं उत्तर देतो तेव्हा तुम्ही त्यांच्या वतीने हल्ला करता’, असं सुषमा स्वराज यांनी सुनावलं आहे.
इस्लामिक देशांच्या मंचावरून सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानला खडेबोलभारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले होते. त्यावेळी भारताकडून दहशतवादाविरोधात उघडलेल्या मोहिमेवर बोलताना सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला होता. दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही एका धर्माविरोधात नसल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले होते. तसेच 'दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही धर्माविरोधातील लढाई नाही. अल्लाचा अर्थ शांती असा होतो. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आसरा देणाऱ्या देशांविरोधात कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी संघटनांना होणारी फंडिंग थांबली पाहिजे' असे आवाहनही सुषमा स्वराज यांनी केले होते.