देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, मंत्र्यांच्या यादीतून आंध्र प्रदेशच्या एक बड्या नेत्याचे नाव गायब होते. यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. हे नाव होते, आंध्र प्रदेश भाजपाध्यक्ष तथा राजमुंद्रीच्या खासदार दग्गुबाती पुरंदेश्वरी यांचे. मात्र, आता भाजप पुरंदेश्वरी यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या एका वृत्तानुसार, पुरंदेश्वरी यांना 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्या सर्वात पुढे आहेत.
पुरंदेश्वरी यांना लोकसभाध्यक्षपद मिळाले, तर त्या या पदावर विराजमान होणाऱ्या आंध्रच्या दुसऱ्या खासदार असतील. यापूर्वी, अमलापुरमचे माजी खासदार गंती मोहन चंद्र (GMC) बालयोगी हे 12व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. 2002 मध्ये लोकसभा अध्यक्ष असतानाच बालयोगी यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
कोन आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी -दग्गुबाती पुरंदेश्वरी या 2023 पासून आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष आहेत. ते तेलगू देसम पार्टीचे (TDP) संस्थापक एनटीआरच्या कन्या आहेत. पुरंदेश्वरी या तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी आंध्र प्रदेशात भाजप, TDP आणि जनसेना यांना एकत्र आणण्यात पुरंदेश्वरी यांची महत्वाची भूमिका होती. या लोकसभा निवडणुकीतीत येथून NDA चे 21 खासदार निवडून आले आहेत. यात 16 TDP, तीन भाजप तर दोन जनसेनेचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीतही NDA ने 175 पैकी 164 जागा जिंकल्या आहेत.
राजमुंदरी येथून खासदार होण्यापूर्वी, पुरंदेश्वरी यांनी काँग्रेसकडून 2004 मध्ये बापटला आणि 2009 मध्ये विशाखापट्टनमचे प्रतिनिधित्व केले होते. 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाले तेव्हा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपला आपला पाय आंध्र प्रदेशात रोवण्यात समस्या येत असतानाच पुरंदेश्वरी यांना जबाबदारी देण्यात आली. पुरंदेश्वरी यांनी पक्षाला आठ विधानसभेच्या जागांवर (लढवलेल्या 10 पैकी) आणि तीन लोकसभेच्या जागांवर (सहा पैकी) विजय मिळवून दिला.
दग्गुबती पुरंदेश्वरी जेव्हा बोलतात, तेव्हा ओघवत्या शैलीत बोलतात. पूर्ण अधिकाराने बोलतात. त्यांच्या भाषणाला भावनिकतेचाही स्पर्श असतो. यामुळे माध्यमांमध्ये त्यांना 'दक्षिणेतील सुषमा स्वराज'ही म्हटले जाते.