ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अद्याप उमेदवारांची नावे निश्चित झाली नसल्याने संभाव्य उमेदवारांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. त्यातच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र सुषमा स्वराज यांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. सुषमा यांना जेव्हा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जात असल्याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या, "राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाचा विचार सुरू असल्याचे वृत्त निराधार आहे." मी परराष्ट्रमंत्री आहे. आणि हा प्रश्न देशांतर्गत आहे, अशी कोपरखळी सुषमांनी मारली.
सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन यांची नावे राष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गांभीर्याने चर्चेत आली होती. स्वराज यांची स्वीकारार्हता व्यापक असून कदाचित काँग्रेसचाही त्यांच्या नावाला पाठिंबा मिळेल, असे मानले गेले. शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठीही पुढे केले होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावास शिवसेनेचा विरोध असणार नाही, असे मानले जाते. पण मंत्रिमंडळात अनुभवी व बुद्धिमान मंत्र्यांची आधीच वानवा असताना स्वराज यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यास पंतप्रधान मोदी फारसे उत्सूक नसल्याचेही समजते.
काही दिवसांपूर्वी सुमित्रा महाजन पंतप्रधानांना भेटल्या तेव्हा त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा विषय संक्षेपाने चर्चेत आल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांनी महाजन यांची स्तुती केली असून सभागृहातील सध्याची रचना पाहता अध्यक्षांच्या खुर्चीत सुमित्राताई नसतील तर लोकसभा चालविणे अत्यंत अवघड जाईल, असे मोदींनी त्यांच्या अपरोक्ष इतरांना बोलून दाखविल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळे सभागृह समर्थपणे चालवू शकेल असे दुसऱ्या कोणाचे तरी नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी तुम्हीच सुचवा, असे मोदी महाजन यांना म्हणाल्याचेही कळते.