नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची घोषणा केली आहे. सुषमा स्वराज भलेही 2019ची लोकसभा निवडणूक लढणार नसतील, पण राजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना स्वराज यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
'मी राजकारणातून निवृत्ती घेत नाहीय, तर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे 2019ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे',असा टोला स्वराज यांनी शशी थरुर यांना हाणला आहे. सुषमा स्वराज यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) इंदुरमध्ये पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली. सुषमा स्वराजांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटले की, 'अनेक राजकीय मतभेद असतानाही, सुषमा स्वराज राजकारण सोडत असल्यानं मी दुःखी झालो आहे'.
शशी थरुर यांच्या ट्विटला सुषमा स्वराज यांनी अतिशय चतुराईनं उत्तर दिलं. थरुर यांना धन्यवाद देत त्यांनी म्हटलं की, ''आपण दोघांनीही पक्षाकडून आपल्याला देण्यात पदांवर कार्य करत राहावे, अशी मी आशा व्यक्त करते''.