ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. २६ - जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, काश्मीर बळकावण्याचं पाकिस्तानने स्वप्न पाहू नये, असं परखड मत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना व्यक्त केले. त्यांनी हिंदीतून भाषण केले. जिनके घर शिसे के होते है वो दुसरे के घर पर पत्थर नही फेकते, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानात काय चाललं आहे, ते पाहावं असा थेट हल्ला सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर केला.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा काश्मीरचे तुणतुणे वाजवले होते. दहशतवादाविषयी संपूर्ण जग चिंता व्यक्त करत असताना पाकिस्तानने मात्र काश्मीरमधील दहशतवादी बुऱ्हाण वणीला 'नेता' म्हणून संबोधले होते. या प्रभावहीन भाषणात पाकिस्तानने केलेल्या आरोपांवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज काय उत्तर देणार, याविषयी जगभरात उत्सुकता होती. या बहुप्रतिक्षित भाषणाची सुरवात करताना सुषमा स्वराज यांनी गरिबी आणि विकास या मुद्यांवर भारताची भूमिका मांडली. 'जगाच्या कानाकोपऱ्यात असलेली गरिबी हे सर्वांत मोठे आव्हान आहे. गरिबी दूर केल्याशिवाय जगात शांतता आणि समृद्धी नांदू शकत नाही,' असे सांगत त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समूहाने सहाय्य करणे आवश्यक असल्याचेही सांगितले. 'जगातील एक षष्ठांश लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचे प्रयत्न भारतात यशस्वी झाले, तर जगातही त्याची अंमलबजावणी करता येईल,' असेही स्वराज म्हणाल्या. नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली, यांविषयीही स्वराज यांनी भारताची भूमिका मांडली. त्यानंतर दहशतवादाचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले. सुषमा स्वराज म्हणाल्या, "न्यूयॉर्कमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या 9/11 च्या भीषण हल्ल्याला याच महिन्यात 15 वर्षे पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी पॅरिससह इतर शहरांमध्येही हल्ले झाले. आमच्यावरही पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवादाशी लढायचे असेल, तर 'दहशतवाद हे मानवाधिकारांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे' ही गोष्ट सर्वांनी मान्य करायलाच हवी. दहशतवाद हा कोणत्याही एका देशाचा विषय नाही. ते संपूर्ण मानवतेचे शत्रू आहेत.
दहशतवाद हे मानवाधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन आहे. दहशतवाद्याला कोण शस्त्रसाठा पुरवते, याचा विचार करणे गरजेचे आहे. आपले मतभेद विसरून दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र आले पाहिजे. दहशतवादाला थारा देणारे सर्वात मोठे दोषी आहेत, दहशतवाद्यांना पाठिंबा देणं हा काही देशांचा शौक झाला आहे. दहशतवादाला साथ देणाऱ्यांना वाळीत टाका, असे थेट अाव्हान सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात केलं. सुषमा स्वराज यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -- आम्ही पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे केला, मात्र त्यांनी आमच्यावर हल्ले केले- बेटी बचाव बेटी पढाव, मेक इन इंडिया आणि जनधन योजना भारताने राबवल्या- एका वर्षात जगात मोठे बदल झाले - जलवायू न्याय द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण जागृती केली - भारतात २ वर्षांत ४ लाख शौचालयं बांधली - जनधन योजनेद्वारे २५ कोटी लोकांची बँक खाती - जगातील गरिबी मिटवणे ही आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे - मेक इंडियामार्फत भारतात रोजगारनिर्मिती - दहशतवाद हा मानवाधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन आहे - दहशतवाद्याला कोण शस्त्रसाठा पुरवते याचा विचार करणे गरजेचे आहे - आपले मतभेद विसरून दहशतवादाविरुद्ध एकत्र आले पाहिजे - दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे - बलुचिस्तानमध्ये काय चालू आहे हे आधी पाकिस्तानने पाहावे - काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, तो पाकिस्तानचा कधीच होणार नाही, पाकिस्तानने स्वप्न पाहणं सोडून द्यावे