ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. 1 - फसवणूक करुन सौदीत विकण्यात आल्यानंतर अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे. एका भारतीय महिलेनेच केलेल्या मदतीमुळे या महिलेची सुटका करणं शक्य झालं. सुखवंत कौर असं या महिलेचं नाव असून एका ट्रॅव्हल एजंटने फक्त साडे तीन लाख रुपयांमध्ये तिला एका सौदी अरेबियामधील कुटुंबाला विकले होते. घराकामासाठी या महिलेला विकण्यात आलं होतं. जानेवारी महिन्यात हा सगळा सौदा झाला होता. कुटुंबाकडून महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आले. अनेकदा तिला अन्न न देता भुकेल्या पोटी ठेवण्यात आले. अखेर सुखवंत कौरची तब्बेत बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
बुधवारी सुखवंत कौर मुंबईला परतली तेव्हा तिने आपल्यावर झालेले अत्याचार आणि संपुर्ण प्रकाराची सविस्त माहिती दिली. "मला रुग्णालयात दाखल केलं असता एका नर्सला माझ्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती मिळाली आणि तिने फोन करुन माझ्या कुटुंबाला माहिती दिली", असं त्यांनी सांगितलं. सुखवंत जालंधर जिल्ह्यातील अजतानी गावातील रहिवासी आहे. "मला जाणुनबुजून पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत काम करायला लावलं जात असे. तसंच मी शाकाहारी असतानाही मांसाहारी खायला दिलं जात होतं", असंही त्या सांगतात.
"पतीच्या कमाईवरुन झालेलं भांडण आणि कर्जाचा बोजा यामुळे आपण सौदी अरेबियाला गेलो होतो", असं सुखवंत कौर यांनी सांगितलं आहे. "ट्रॅव्हल एजंट पूजाने माझ्याकडून40 हजार रुपये घेतले होते, आणि भल्या मोठ्या रकमेच्या बदली माझी विक्री केली होती", असंही त्या सांगतात.
"ती मला नेहमी फोन करत असे, पण अचानक ते बंद झाल्याने माझी चिंता वाढली. तेथील रुग्णालयामधून मला फोन आला असता तिच्या परिस्थितीची माहिती मिळाली. माझ्या एका मित्राने परराष्ट्र मंत्रालयाला ट्विट करण्याचा सल्ला दिला. देवाच्या कृपेने सुषमा स्वराज यांनी माझ्या ट्विटची दखल घेतली आणि पुढच्या 24 दिवसांत माझी पत्नी घरी परतली", अशी माहिती सुखवंत यांचे पती कुलवंत सिंह यांनी दिली आहे.
भारतीय दुतावासाच्या मदतीने सुखवंत यांनी मुंबईला आणण्यात आलं. त्यांच्याकडे काहीच पैसे नसल्याने सरकारने त्यांची अमृतसरला पोहचवण्याची सोय केली. मुंबई पोलिसांनी ट्रॅव्हल एजंटला अटक केली आहे.