नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी एका सात वर्षीय पाकिस्तानी मुलीला तिच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी व्हिसा देण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानी महिलेने ट्विटवरून सुषमा स्वराज यांच्याकडे मेडिकल व्हिसासाठी मदत मागितली होती. त्या मागणीनंतर सुषमा स्वराज यांनी व्हिसा देण्याचे आदेश दिले आहेत. कराचीतून भारतात येण्यासाठी मेडिकल व्हिसा देण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या आहेत.
पाकिस्तानी महिला निदा शोएब यांनी त्याच्या सात वर्षीय मुलीला ओपन हार्ट सर्जरीची गरज असल्याचं ट्विट केलं होतं. या सर्जरीसाठी व्हिसा मिळावा यासाठी ऑगस्टपासून वाट पाहत असल्याचंही ट्विट निदा शोएब या महिलेने केलं होतं. मुलीची सर्जरी करण्याची गरज असून त्यासाठी मेडिकल व्हिसा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तुमच्या मदतीची गरज असल्याचंही त्या महिलेने ट्विटमध्ये म्हंटलं आहे. आपल्या मागणीकडे सुषमा स्वराज यांचं लक्ष वेधण्यासाठी त्या महिलेने आणखी एक ट्विट केलं. मुलीला असलेल्या आजारामुळे ती शाळेत जाणं किंवा पळणं अशा साध्या गोष्टीही करू शकत नसल्याचं तिने केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
या पाकिस्तानी महिलेच्या मागणीची दखल घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ' हो. आम्ही तुमच्या सात वर्षीय मुलीला ओपन हार्ट सर्जरीसाठी भारतात यायला व्हिसा देतो आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करू, असं स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. पाकिस्तानमधील या सात वर्षीय मुलीची सर्जरी नोएडामधील हॉस्पिटलमध्ये होणार आहे.
पाकिस्तानातील नागरिकांना मेडिकल व्हिसासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांना मेडिकल व्हिसा दिल्याचं सांगितलं आहे. ऑगस्ट महिन्यात एका पाकिस्तानी महिलेला कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मेडिकल व्हिसा देण्यात आला होता.
सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया
सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी मुलीला दिलेल्या मेडिकल व्हिसावरून सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. सुषमा स्वराज यांच्या निर्णयाचं काही नेटिझन्सकडून कौतुक केलं जातं आहे तर काही जण यावर टीकाही करत आहेत. भारत लोकांना आयुष्य देतं तर पाकिस्तान लोकांचं आयुष्य हिरावून घेतं, असं एका ट्विटर युजरने म्हंटलं आहे.पाकिस्तानकडून आपली लोक दररोज मारली जात आहेत, आपणही तसंच वागायला हवं, असंही ट्विट एका युजरने केलं आहे.