ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - अडीअडचणीत असताना ट्विटरवरून मदत मागणाऱ्यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याची अनेक उदाहरणे दिली जातात. पण असे एक ट्विट आहे ज्यात मदत मागणाऱ्याला स्वराज यांनी अद्याप मदत केलेली नाही. एका भारतीय तरुणीने आपल्या विवाहासाठी पाकिस्तानी मैत्रिणीला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळावा अशी विनंती या ट्विटमधून केली आहे.
पूर्वी ठाकूर या भारतीय तरुणीची पाकिस्तामधील साराह मुनीर ही मैत्रिण आहे. पूर्वी हिचे लग्न ठरले असून, आपल्या जवळच्या मैत्रिणीलाही या लग्नसोहळ्यात येता यावे, अशी पूर्वीची इच्छा आहे. मात्र मुनीर हिने व्हिसासाठी केलेला अर्ज फेटाळून लवण्यात आला आहे. त्यामुळे साराह हिला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळावा, अशी विनंती पूर्वी हिने ट्विटरवरून सुषमा यांना केली होती. मात्र तिला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, पूर्वीने मुनीर हिला भारतात यायला मिळावे यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली असून, तिची फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे.
"माझ्या जीवनातील सर्वात मोठ्या दिवशी माझी सर्वोत्तम मैत्रिण येऊ शकणार नसेल तर ते माझ्यासाठी दु:खद असेल. अनेक महिन्यांपासून समन्वय राखून आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही व्हिसासाठीचा अर्ज का फेटाळण्यात आला हे आम्ही समजू शकलेलो नाही,"असे पूर्वी म्हणाली. दरम्यान, उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि भारत पाकिस्तान सीमेवर असलेला तणाव यामुळे मुनीर हिचा व्हिसा अर्ज फेटाळण्यात आला असावा. अशी शक्यता आहे.
Hoping social media and human connections can help @SarahMunir1 and me!Cc @SushmaSwarajpic.twitter.com/tCjoYYkFk9— Purvi Thacker (@purvi21) November 1, 2016