नवी दिल्ली, दि. 14 - गेल्या अनेक दिवसांपासून भारतात उपचारासाठी येण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानी कॅन्सर पीडित महिलेला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. फैजा तनवीर या पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांना ट्विट करत तुम्ही माझ्या आईसारख्या असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत पुन्हा एकदा आपल्याला व्हिसा मिळवून देण्यासाठी विनंती केली. सुषमा स्वराज यांनी तात्काळ ट्विटची दखल घेत शुभेच्छा स्विकारल्या आणि व्हिसा देत असल्याचं जाहीर केलं. फैजा तनवीर त्याच महिला आहेत, ज्यांच्यासाठी सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना सुनावलं होतं.
तोंडाचा कॅन्सर असलेल्या पीडित फैजा यांनी रविवारी सुषमा स्वराज यांचा उल्लेख करत ट्विट केलं होतं. 'मॅडम तुम्ही माझ्यासाठी आईच आहात, कृपया मला मेडिकल व्हिसा द्या. 70 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात कृपया माझी मदत करा', असं ट्विट फैजा यांनी केलं होतं.
यानंतर रात्री 11 वाजताच्या आसपास सुषमा स्वराज यांनी ट्विटला उत्तर देत मेडिकल व्हिसा देत असल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं की, 'स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. आम्ही तुम्हाला भारतात उपचारासाठी मेडिकल व्हिसा देत आहोत'.
महत्वाचं म्हणजे फैजा यांनी याआधीही व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र सर्व नियमांचं पालन न केल्याने भारतीय दुतावासाने त्यांचा अर्ज नाकारला होता. पाकिस्तानी मीडियाने हा मुद्दा मोठा करत भारतावर अमानुष असल्याचा आरोप केला होता. यानंतर सुषमा स्वराज यांनी यावरुन संताप व्यक्त करत पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 'आपल्या देशातील नागरिकांनी मेडिकल व्हिसा मिळण्यासाठी परवानगी देण्यामध्ये सरताज अझीझ यांना काय समस्या आहे ?', असा प्रश्ना त्यांनी विचारला होता.
सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा नियमात झालेला बदल स्पष्ट करत पाकिस्तानी नागरिकाला उपचारासाठी तात्काळ मेडिकल व्हिसा हवा असेल तर सरताज अझीझ यांच्या पत्राची आवश्यकता असल्याचं सांगितलं होतं.
फैजा गेल्या खूप दिवसांपासून उपचारासाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होत्या. फैजा यांनी गाजियाबादमधील इंद्रप्रस्थ दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार करायचे आहेत. सुषमा स्वराज यांनी व्हिसा दिला असल्या कारणाने फैजा यांचा उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.