नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताचे उमेदवार न्यायाधीश दलवीर भंडारी यांची आणखी नऊ वर्षांसाठी फेरनिवड झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे. भारताचा हा विजय सहजासहजी झाला नसून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून राबवण्यात आलेली आक्रमक कूटनीती यासाठी कारणीभूत ठरली. भारताला मोठ्या प्रमाणात मिळणार समर्थन मिळताना पाहून ब्रिटनचे उमेदवार न्यायाधीश ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने भारताला आपल्या विजयाची खात्री पटली.
भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदी निवड व्हावी यासाठी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: सक्रिय होत्या. दलवीर भंडारींना पुर्ण समर्थन मिळावं यासाठी सुषमा स्वराजांनी परराष्ट्र मंत्र्यांना 60 हून जास्त फोन कॉल्स केले. परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनीदेखील सोमवारी होणा-या पुढील राऊंडच्या निमित्ताने देशभरातील नेत्यांशी चर्चा करत भारताची बाजू त्यांच्यासमोर मांडली. मंगळवारी दलवीर भंडारी यांची निवड झाल्यानंतर एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिन आणि वरिष्ठ नेत्यांना फोन करुन भारताच्या बाजूने मतदान करण्यासाठी इतर देशांना तयार केल्याबद्दल आभार मानले. परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनीदेखील दलवीर भंडारी यांना समर्थन मिळावं यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.
'भारताच्या इतिहासातील हा एक मोठा दिवस होता. जगाचा भारताबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे', अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयातील १५पैकी ५ न्यायाधीशांची मुदत संपल्याने त्या जागांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा आणि सुरक्षा परिषदेत एकाच वेळी मतदान घेण्यात आले. ब्रिटनचे उमेदवार न्या. ख्रिस्तोफर ग्रीनवूड आणि न्या. भंडारी यांच्यात लढत अपेक्षित होती. परंतु भारताच्या मुत्सद्दीगिरीमुळे न्या. भंडारी यांचे पारडे जड असल्याचे जाणवताच ब्रिटनने न्या. ग्रीनवूड यांची उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली. परिणामी, महासभेत १९३पैकी १८३ व सुरक्षा परिषदेत सर्व १५ मते मिळवून ७० वर्षांचे न्या. भंडारी सहज विजयी झाले. या निवडणुकीसाठी पडद्यामागून सूत्रे हलविणारे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन यांनी न्या. भंडारी यांच्या विजयाबद्दल खास स्वागत समारंभ आयोजित करून आनंद साजरा केला.
- कसे असते हे न्यायालय?सदस्य देशांमधील वाद सोडविण्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य न्यायिक अंग.सन १९४५मध्ये स्थापना.एकूण १५ न्यायाधीशांची आमसभा व सुरक्षा परिषदेकडून निवड.न्यायाधीशांची मुदत एका वेळी नऊ वर्षे. फेरनिवडीस पात्र.न्यायाधीशांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड.त्यांची मुदत प्रत्येकी तीन वर्षे