ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले आहे. गिलगिट आणि बाल्टिस्थानला पाकिस्तानचा पाचवा प्रांत घोषित करण्याच्या पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत सुषमा यांनी पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्थानसह संपूर्ण काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे, असे सांगितले.
आज लोकसभेमध्ये बीजू जनता दलाचे खासदार भर्तृहरी महताब यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, "पाकिस्तानचे ही आगळीक भारत कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. सरकारसह संपूर्ण सभागृह काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मानते." गेल्या महिन्यात पाकिस्तानने गिलगिट, बाल्टिस्थान हा आपला पाचवा प्रांत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानचा हा दावा तात्काळ फेटाळून लावला होता.
काश्मीरबाबत लोकसभा आणि राज्यसभेत प्रस्ताव पारीत झालेले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्थानसह पूर्ण काश्मीर भारताचा भाग असल्याचे संसदेने पारीत केलेले आहे. काश्मीरबाबत संसदेने संकल्प केलेला आहे. सोबतच सत्ताधारी पक्षही याबाबत संकल्पबद्ध आहे, असेही सुषमा स्वराज यांनी पुढे सांगितले. आज लोकसभेच्या कामकाजादरम्यान शून्य प्रहरात बीजू जनता दलाचे खासदार महताब यांनी गिलगिट, बाल्टिस्थानला पाकिस्तानने आपला पाचवा प्रांत घोषित केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.