नवी दिल्ली – काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर करून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. १५ ऑगस्ट रोजी सुष्मिता देव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर खात्यावर काँग्रेसच्या माजी नेत्या असा उल्लेख केला होता. त्यामुळे दिल्लीत विविध चर्चांना उधाण आलं होतं.
सोमवारी सकाळी सुष्मिता देव यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं. या पत्रात लिहिलं होतं की, मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. गेल्या ३ दशकापासून माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. मी यानिमित्ताने सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. मॅडम, तुम्ही मला दिलेल्या संधीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तुमचे वैयक्तिक आभार मानते. हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
टीएमसीचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आसामच्या सिलचर येथील लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, तृणमूलमध्ये सहभागी झाल्यानंतर सुष्मिता देव यांना त्रिपुरा पार्टी प्रभारीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी त्रिपुरामध्ये निवडणुका होणार आहेत. याठिकाणी तृणमूल काँग्रेस संपूर्ण ताकद पणाला लावत आहे.
कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह
सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. जेव्हा युवा नेते पक्ष सोडून जातात तेव्हा आम्हा वृद्धांना आपल्या नेतृत्वावर दोष ठेवण्यासाठी मजबूर करतो. डोळे बंद करून पार्टी पुढे जात राहते असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल की सुष्मिता देवसारखे नेते पक्ष सोडून का जात आहेत? असं पक्षाचे नेते कार्ती चिंदबरम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुष्मिता देव काँग्रेस नेत्या आहेत. त्या पक्ष सोडतील असं वाटलं नव्हतं. आम्ही एकाच कुटुंबासारखे आहोत. जर काही समस्या असेल तर त्या चर्चा करून सोडवत्या आल्या असत्या असं काँग्रेस खासदार रिपुन बोरा म्हणाले तर मी सुष्मिता देव यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्या आमच्य कर्तुत्ववान नेत्या आहेत. त्यांचे कुठलेही पत्र सोनिया गांधी यांना मिळाले नाही. आम्ही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.