बारमेर : चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाला पोलिसांनी कोठडीत इतकी मारहाण केली, की त्याचा त्यात मृत्यू झाला असून, त्यामुळे त्याचे कुटुंबीय, नातेवाईक व स्थानिक रहिवासी अतिशय संतापले आहेत. त्यांनी रुग्णालयाच्या शवागाराबाहेर धरणे धरले असून, जोपर्यंत आम्हाला नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.जितू खाटिक या दलित तरुणाला पोलिसांनी चोरीच्या संशयावरून बुधवारी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आधीचा कोणताही गुन्हा नाही आणि संशयावरून ताब्यात घेतल्यानंतरही पोलिसांनी त्याची नोंद केली नाही. त्याला कोठडीत इतकी मारहाण केली, की तो तिथेच गुरुवारी सकाळी मरण पावला. त्यामुळे जितूच्या भावाने बारमेर ठाण्याच्या मुख्य पोलीस अधिकारी व अन्य पोलीस कर्मचारी यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. भावाने केलेल्या आरोपात तथ्य आढळल्याने मुख्य प्रमुख पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, तेथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांचे काम काढून घेण्यात आले आहे. बारमेरचे पोलीस अधीक्षक व सर्कल आॅफिसर यांनाही तेथून हलवण्यात आले असून, त्यांना नवे पोस्टिंग देण्यात आलेले नाही. जितूविरुद्ध कोणताही गुन्हा नसल्याचेही उघड झाले आहे, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सर्व संबंधित पोलिसांवर कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले आहे, तसेच या कायद्याखाली ठरलेली भरपाईची रक्कमही देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. (वृत्तसंस्था)>कुटुंबाच्या या आहेत मागण्यासंबंधित पोलिसांवर कडक कारवाई, एक कोटी रुपये नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, अशा मागण्या कुटुंबीय व नातेवाईकांनी केल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत जितूचे शवविच्छेदन करू देणार नाही, असे कुटुंबियांनी म्हटले असून, त्यामुळे मृतदेह शवागारातच आहे. आम्ही कुटुंबियांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत संशयिताचा कोठडीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 5:57 AM