कोची : कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवून उपचार करण्यात येत असलेल्या एका रुग्णाचा अर्नाकुलम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या रुग्णाला खरंच कोरोनाची लागण झाल्याचे अंतिमत: सिद्ध झाले, तर जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूने घेतलेला भारतातील तो पहिला बळी ठरेल.जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रुग्णाच्या पहिल्या चाचणीत कोरोनाचे विषाणू आढळलेले नव्हते. दुसºया चाचणीचे निष्कर्ष अद्याप हाती आलेले नाहीत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री कुमारी शैलजा म्हणाल्या की, या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला, याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही.कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते. या आधीही केरळमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळले होते. ते चीनमधून आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.त्यानंतर ते बरे झाले. नंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे न आढळल्याने घरी पाठविण्यात आले. (वृत्तसंस्था)
केरळमध्ये संशयित कोरोना रुग्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 4:02 AM