जम्मू: जम्मू येथील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता जम्मूमधील कुंजवानी-रत्नूचक भागात पुन्हा एकदा ड्रोन दिसल्याची माहिती मिळाली असून, गेल्या २४ तासांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे धोका अद्याप टळलेला नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच वायुदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे सोपवण्यात आला आहे. (suspected drone activity was seen late night in Kunjwani Ratnuchak area of Jammu)
सोमवारी कालूचक मिलिट्री स्टेशनजवळ ड्रोन आढळून आला होता, असे सांगितले जात आहे. यानंतर सोमवारी रात्री उशिरा कुंजवानी-रत्नूचक भागात ड्रोन आढळून आला. मध्यरात्री सुमारे अडीच ते तीन वाजता ड्रोन दिसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर अँटी ड्रोनसह कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच ड्रोन दिसल्यास तातडीन कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
अलर्ट कायम
सलग दोन दिवस ड्रोनच्या हालचाली दिसल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, अलर्ट कायम आहे. भारतीय सेनेच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. कालूचक येथे ड्रोन आढळल्यानंतर कुंजवानी, पुरमंडळ मोड, बाडी ब्राह्मणा, रत्नूचक, राष्ट्रीय हायवे येथे शोधमोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पोलीस आणि भारतीय सेनेच्या संयुक्त पथकाकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. सोमवारी रात्री दिसलेला ड्रोन एक होता की तीन याबाबत अधिक तपास केला जात आहे.
पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप
दरम्यान, जम्मू येथील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात भारतीय वायुदलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. पहिला स्फोट शहरालगच्या सतवारी भागातील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावरील अत्यंत सुरक्षित एक मजली इमारतीत तर दुसरा खुल्या जागेत झाला.