नवी दिल्ली - दिल्ली पोलीस व गुजरात एटीएसनं संयुक्त कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बिलाल अहमद कावाला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. कावा हा लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहे. 22 डिसेंबर 2000 रोजी लाल किल्ल्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्यातील तीन जवान शहीद झाले होते. या प्रकरणी 11 दोषींना कोर्टानं शिक्षादेखील सुनावली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान लष्कर-ए-तोयबानं 29 लाख 50 हजार रुपयांचं फडिंग केल्याची माहिती समोर आली. ही रक्कम मुख्य सूत्रधार आरिफनं हवालामार्फत बिलाल अहमद कावाच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकली होती. बुधवारी (10 जानेवारी ) बिलाल श्रीनगरहून दिल्लीला येत असल्याची गुप्त माहिती गुजरात पोलिसांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ दिल्ली पोलिसांना देत संयुक्त कारवाई करत बिलालला दिल्ली विमानतळावरुन अटक केली.
लाल किल्ल्यावरील हल्ल्यानंतर कावा काश्मीरमध्ये लपून बसला होता. बिलाल काश्मीरहून दिल्लीला येणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावा गुजरात एटीएसनं केला आहे. यानंतर दिल्ली पोलीस व गुजरात एटीएसनं संयुक्त कारवाई करत बिलाल अहमद कावाला अटक केली. लाल किल्लावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा बिलाल जवळपास 20 वर्षांचा होता.