नवी दिल्ली/ बिजनौर : राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी मोहम्मद तंजील अहमद हत्याप्रकरणाची चौकशी करीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती लागलेल्या लग्नाच्या व्हिडिओ फुटेजमध्ये दोन संशयित हल्लेखोर दृष्टीस पडले आहेत. वर आणि वधूपक्षाच्या लोकांपैकी कुणीही या दोघांना ओळखलेले नाही. याशिवाय पोलिसांनी लग्नाची छायाचित्रेही तपासासाठी ताब्यात घेतली आहेत.तंजील अहमद यांची गेल्या रविवारी मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी सुमारे २४ गोळ्या घालून हत्या केली होती. चार गोळ्या लागलेल्या अहमद यांच्या पत्नी फरजाना या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अहमद यांच्या हत्येपूर्वी लग्नात सामील झालेला एक संशयित हल्लेखोरांपैकीच एक होता. व्हिडिओत तो दिसला असून त्याचे छायाचित्र जारी केले जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)1 इंडियन मुजाहिदीन (आयएम) या अतिरेकी संघटनेशी संबंध असलेल्या अनेक प्रकरणांचा तपास करीत असलेल्या एनआयएच्या चमूत अहमद सहभागी होते. त्यामुळे दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या तपासात महत्त्वाची भूमिका वठविल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करीत आहेत.2 राज्याच्या दहशतवादविरोधी दलाचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी सांगितले की, अहमद यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही आणि आम्ही दहशतवादासोबतच इतर संभाव्य कारणांचाही विचार करीत आहोत.3 पोलिसांनी अहमद यांच्या गावातील काही घरांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे रेकॉर्डिंगही मिळविले आहे. त्यात दोन संशयित मोटरसायकलस्वार दिसत आहेत. परंतु चेहरे मात्र स्पष्ट नाहीत. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अहमद यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सुरक्षा प्रदान करण्याची घोषणा केली आहे.
लग्नाच्या व्हिडिओत दिसले संशयित
By admin | Published: April 06, 2016 4:43 AM